Ad will apear here
Next
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे बदलतोय आरोग्य सेवांचा चेहरामोहरा!
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे सर्वसाधारण आरोग्य सेवा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल होऊ लागले आहेत. त्याविषयी पाहू या ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात... 
........
सध्या जगभरात दीर्घकालीन आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्यावरील उपचारांसाठी होणारा खर्चही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कार्यक्षम आरोग्यसेवा पुरवण्यामध्ये असलेली आव्हाने हेदेखील यातील एक कारण आहे. तज्ज्ञ आणि चिकित्सकांच्या अनेक जागा अनेक रुग्णालयांत रिक्त आहेत. रुग्णालयांमध्ये पुरेशा बेड्सची कमतरता आहे. रुग्णांना रुग्णालयात चांगली सेवा मिळण्यासाठी खूप वेळ थांबावे लागते. 

या सगळ्याचा विचार करता रोगनिदान जितक्या लवकर होईल तितके गरजेचे आहे. अनेकांचा मेडिक्लेम असला, तरी उपचारांसाठी येणारा खर्च बऱ्याच वेळा त्यापेक्षाही जास्त असतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) वापर झाल्यास अनेक गोष्टी सुखकर, सोयीस्कर होऊ शकतात. पुढे उदाहरण पाहा..

रस्त्यावर एक माणूस आणि त्याची बाइक पडलेली होती. नुकताच अपघात झाला होता...

हा माणूस कोण आहे? त्याला नक्की काय झालंय? कुठे न्यायचंय? याचे नातेवाईक कोण आहेत? इन्शुरन्सचे काय?

असे अनेक प्रश्न तिथे उभे असलेल्या सगळ्यांनाच पडले होते; पण त्याच्या हातात असलेल्या ‘हेल्थ बँड’ने पुढच्या गोष्टी सोप्या केल्या. अर्थात ‘आयओटी’ने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि योग्य ती कार्यवाही होऊन त्याच्यावर उपचार झाले.

आरोग्य सेवांमध्ये रिमोट मॉनिटरिंग, स्मार्ट सेन्सर, वेगवेगळी वैद्यकीय साधने यांचा उपयोग करून ‘आयओटी’वर आधारित सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवांचा उद्देश केवळ माणसांनी सुरक्षित आणि निरोगी राहावे इतकाच नसून, डॉक्टर करत असलेले उपचार अधिकाधिक उपयुक्त कसे ठरतील हादेखील आहे

हा विषय अजून सोप्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू या. ‘फिटनेस बँड’ तुम्हाला माहिती असेल. त्यातही ‘आयओटी’चाच वापर केला जातो. आरोग्य चांगले राखण्याशी संबंधित असलेली फिटनेस बँडसारखी गॅजेट्स आपल्या रोजच्या दिनचर्येची नोंद ठेवतात. आपण किती चालतो यापासून झोपायची वेळ, खाण्याची वेळ आणि अन्य बरीच माहिती यावर गोळा केली जाऊ शकते. दिवसभरात आपण कधी काय करायला हवे यासाठी अलार्म सेट करता येऊ शकतो. दिवसभरात आपल्या शरीरात किती कॅलरीज कशा पद्धतीने घेतल्या गेल्या आणि वापरल्या गेल्या याविषयी माहिती घेणे आणि त्याआधारे आवश्यक ते योग्य बदल करणे अशा उपकरणांमुळे सोपे जाते.

वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि सेन्सर्स यांमुळे आता आरोग्य सेवा बदलत चालली आहे. त्यात लहान सेन्सरचे शरीरामध्ये रोपण केले जाते. ते सतत महत्त्वपूर्ण गोष्टींचे निरीक्षण करत असतात. कुठलीही विसंगती आढळल्यास ती नोंदवली जाते. यासंबंधी डॉक्टर आणि रुग्ण या दोघांनाही मोबाइलवर माहिती पाठवली जाते. त्यानुसार वेळेत वैद्यकीय मदत घेऊन उपचार करणे सोपे जाते. 

‘आयओटी’वर आधारित असलेली काही उपकरणे आणि त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात होणारा वापर :

स्थान शोधणारी साधने : वृद्ध व्यक्ती किंवा मानसिक विकार असलेल्या व्यक्ती वाट विसरतात, पत्ता विसरतात यांसारख्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. अशा व्यक्तींकडे जीपीएसवर आधारित असलेली उपकरणे (ट्रॅकर) दिल्यास संबंधित व्यक्ती कुठे आहेत, हे घरच्या व्यक्तींना सहज कळू शकते.

आजाराची तीव्रता कमी करण्यास मदत करणारी उपकरणे

निरीक्षण करणारी साधने : काही ट्रॅकिंग उपकरणे श्वास गती, हृदय गती, शरीराचे तापमान यांचे मोजमाप करतात. त्यानुसार उपचारांना त्वरित प्रतिसाद मिळावा या दृष्टीने रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना योग्य ती माहिती दिली जाते.

शरीरातील महत्त्वपूर्ण बदलांवर लक्ष ठेवणारी साधने

विविध आजारांच्या उपचारांसाठीही याचा वापर केला जातो. उदा : कर्करोगावरील उपचार, मधुमेहासारख्या आजारांसाठी ग्लुकोज मॉनिटरिंग, इन्सुलिन वितरण, दम्यासारख्या आजारांसाठी कनेक्टेड इनहेलर्स, डिप्रेशनवर नियंत्रण ठेवणारी अॅप्स, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा, इत्यादी. 



आयओटी नक्की कसे काम करते, हे कळण्यासाठी वरील चित्र पाहा. माणसाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे विविध प्रकारचे सेन्सर लावून याद्वारे माहिती घेतली जाते. मग त्यात तापमान, नाडीची स्पंदने किंवा यंत्राद्वारे घेतली गेलेली अजून काही माहिती आदींचा समावेश असतो. ही सगळी माहिती ‘आयओटी’च्या रचनेमधून जाते. या रचनेमध्ये तर्कशास्त्र, आधीच्या वैद्यकीय नोंदी इत्यादी गोष्टींच्या आधारे माहितीचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार योग्य ती कृती केली जाते. म्हणजेच रुग्णालयाला, डॉक्टरला, रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना योग्य तो अलार्म दिला जातो.

‘आयओटी’मुळे रुग्णांना लवकरात लवकर चांगली सेवा मिळू शकते आणि आरोग्यसेवेचा खर्चही कमी होऊ शकतो. ‘आयओटी’द्वारे आरोग्य सेवेत रुग्णांना वेगवेगळ्या सुविधा देता येऊ शकतात. त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी संबंधित यंत्रणा एकत्र येऊन चालवणे खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य सेवा साधने, त्यातून होणाऱ्या विविध प्रक्रिया या सर्वसमावेशक आणि एकीकृत असणे आणि सुरक्षितपणे चालवल्या जाणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) होणे महत्त्वाचे आहे. वापरात येणारी यंत्रणा आणि सॉफ्टवेअर हे त्या उद्देशासाठी योग्य आहे ना, याची पडताळणीही गरजेची आहे. व्यक्तीच्या आरोग्याविषयीची गोपनीय माहिती जाहीर केल्याने एखाद्या व्यक्तीचे सामाजिक जीवनात अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. त्यामुळे यातून गोळा होणाऱ्या माहितीच्या प्रसारावर नियंत्रण राहील, याची काळजी घेण्याची गरज आहे.

यात वेगवगेळी आव्हाने आहेतच; पण रुग्णांना मिळणाऱ्या सेवेवर ‘आयओटी’मुळे सकारात्मक परिणाम होत आहे. यथावकाश तंत्रज्ञ या आव्हानांवर नक्कीच मात करतील. अर्थात, नागरिकांमध्ये याविषयी जागरूकता होणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

- अनुष्का शेंबेकर
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSGCD
Similar Posts
लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये ‘आयओटी’चा वापर लघू व मध्यम उद्योग अर्थात ‘एसएमई’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, यावर एक नजर... ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’च्या आजच्या भागात...
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि वाहने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे ऑटोमोबाइल अर्थात वाहन क्षेत्रात मोठे बदल होऊ लागले आहेत. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
शिक्षण क्षेत्रात ‘आयओटी’चा उपयोग! शिक्षण क्षेत्रात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, याविषयी पाहू या ‘इंटरनेट यत्र, तत्र, सर्वत्र’ या सदराच्या आजच्या भागात...
शेतीमध्येही ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’ तंत्रज्ञान शेती क्षेत्रातही उपयोगी ठरू शकते. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language